कोकणदेश-विदेशमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

कोकण सावंतवाडी टर्मिनसला लवकरच प्रा. मधु दंडवते यांचे नाव…

कोकण रेल्वेच्या निर्मितीत दंडवतेंचे योगदान...

कोकण रेल्वेच्या निर्मितीत दंडवतेंचे योगदान का महत्त्वाचे?…राज्य सरकारने सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला लोकमान्य मधु दंडवते टर्मिनस असे नाव देण्यास मंजुरी दिली आहे. तसा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे सादर केला जाणार आहे. कोकणवासीयांनी सावंतवाडी येथे ऐतिहासिक गांधी चौकात पेढे वाटून आणि फटाके फोडून या निर्णयाचे स्वागत केले. हा निर्णय कोकणवासीयांसाठी भावनिक कसा, याचा थोडक्यात आढावा.

*राज्य सरकारचा निर्णय काय?*

कोकणातील जनतेच्या भावनांची दखल घेऊन राज्य सरकारने सावंतवाडी रेल्वे स्थानकाला लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस असे नामकरण करण्यास नुकतीच मंजुरी दिली. हा निर्णय म्हणजे कोकण रेल्वे प्रकल्पाच्या उभारणीत मधु दंडवते यांच्या योगदानाचा गौरव मानला जात आहे. कोकणातील डोंगराळ भाग, दऱ्या-खोरी, नद्या-नाले आणि समुद्रालगत असलेल्या प्रदेशातून रेल्वे उभारणे कठीण असल्याचा मतप्रवाह होता. मात्र तरीही जनता पक्षाच्या काळात रेल्वेमंत्री राहिलेले मधु दंडवते यांनी निश्चयाने कोकण रेल्वेची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला प्रा. दंडवते यांचे नाव देण्याची मागणी सातत्याने केली जात होती.

*कोकण रेल्वेच्या उभारणीत दंडवतेंचे योगदान*

कोकणाला मुंबई आणि कर्नाटकाशी रेल्वेमार्गाने जोडण्याची मागणी १९५० पासून केली जात होती. पण देशाच्या पश्चिम किनाऱ्याला समांतर रेल्वेमार्ग बांधणे जिकिरीचे आणि आव्हानात्मक होते. त्यामुळे या मागणीची फारशी दखल घेतली जात नव्हती. बॅ. नाथ पै यांनी या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. नंतर जनता पक्षाच्या काळात रेल्वेमंत्रिपद भूषवलेले प्रा. मधु दंडवते यांनी कोकण रेल्वेच्या प्रकल्पाची पायाभरणी केली. आपटा ते रोहा मार्गाचे काम त्यांच्या कारकिर्दीत सुरू झाले. नंतर जॉर्ज फर्नांडिस यांच्या कार्यकाळात कोकण रेल्वेचे उर्वरित काम मार्गी लागले. त्यामुळे बॅरिस्टर नाथ पै, प्रा. मधु दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस या तीन समाजवादी नेत्यांचे कोकण रेल्वेच्या उभारणीत योगदान महत्त्वाचे मानले जाते. प्रामुख्याने मधु दंडवते यांना कोकण रेल्वेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते.

*कोकण रेल्वे उभारणीतील महत्त्वाचे टप्पे*

कुडाळ तालुक्यातील वालावल येथील अ. ब. वालावलकर यांनी पहिल्यांदा कोकण रेल्वेची संकल्पना मांडली. त्यासाठी त्यांनी बरेच जनप्रबोधन केले. यानंतर रत्नागिरीतून लोकसभेत निवडून गेलेले काँग्रेस खासदार मोरोपंत जोशी यांनी पहिल्यांदा लोकसभेत कोकण रेल्वेची मागणी केली. १९५७ ते १९७० या काळात राजापूर मतदारसंघातून लोकसभेवर गेलेले बॅ. नाथ पै यांनी कोकण रेल्वेच्या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. कोकण रेल्वेच्या सर्वेक्षणाची अर्थसंकल्पात तरतूद नाही म्हणून त्यांनी एक रुपयाची कपात सूचना मांडली होती. या कपास सूचनेनंतर पहिल्यांदा कोकण रेल्वेचे सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले होते. १९७७ साली मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली पहिले बिगर काँग्रेसी सरकार आले, ज्यात प्रा. मधु दंडवते यांना रेल्वे मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. या संधीच्या फायदा घेत दंडवते यांनी पहिल्याच रेल्वे अर्थसंकल्पात कोकण रेल्वेच्या पाया भरणीची मुहूर्तमेढ रोवली. आपटा ते रोहा रेल्वेमार्गाचे काम त्यांनी मार्गी लावले. मात्र मोरारजी देसाई यांचे सरकार अल्पमतात आले आणि मधु दंडवते यांचे मंत्रिपद गेले. त्यामुळे कोकण रेल्वेच्या पुढच्या कामाला खीळ बसली. पुढे १९९० मध्ये विश्वनाथ प्रताप सिंह यांच्या नेतृत्वाखाली जनता दलाचे सरकार स्थापन झाले. यात मधु दंडवते यांच्याकडे अर्थमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली गेली. तर जॉर्ज फर्नांडिस रेल्वेमंत्री झाले. यानंतर दडवते यांनी पुन्हा एकदा कोकण रेल्वेच्या कामाला गती दिली. जॉर्ज फर्नांडिस यांच्या मदतीने कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना करून त्यांनी हा प्रकल्प मार्गी लावला. कर्जरोखे काढून निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे मधु दंडवते यांना कोकण रेल्वेचे शिल्पकार म्हटले जाऊ लागले.

*कोकण रेल्वे का जिव्हाळ्याची?*

१५ सप्टेंबर १९९० साली कोकण रेल्वे प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. आठ वर्षांनी २६ जानेवारी १९९८ मध्ये या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. कोकण रेल्वे मार्गावर पहिली रेल्वे या दिवशी धावली. रेल्वेमुळे कोकणातील वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ झाली. कोकणात प्रवासासाठी सर्वात सुरक्षित आणि किफायतशीर पर्याय म्हणून रेल्वे ओळखली जाते. २७ जून २०१५ रोजी सावंतवाडी येथे रेल्वे टर्मिनस उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सुरेश प्रभू रेल्वेमंत्री असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सावंतवाडी टर्मिनसचे भूमिपूजन पार पडले होते. पण गेली दहा वर्षे टर्मिनस उभारणीचे काम रखडले होते. त्याबद्दल सावंतवाडीतील प्रवासी संघटनांनी आंदोलने आणि पाठपुरावा केल्याने आता या टर्मिनसच्या कामाला सुरुवात झाली आहे. गेल्या दहा वर्षांपासून सावंतवाडी येथे उभारण्यात येणाऱ्या रेल्वे टर्मिनसला मधु दंडवते यांचे नाव देण्याची मागणी केली जात होती. तसा प्रस्ताव शासनस्तरावर प्रलंबित होता. आता राज्य सरकारने त्यास मंजुरी दिल्याने कोकणवासीयांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button