कोकणमहाराष्ट्रसामाजिक

चिपळूण हादरलं माणुसकीला काळीमा फासणारी घटना..

आंब्याच्या बागेत जळलेल्या अवस्थेत चिमुकल्याचा मुतदेह दीडमहिना बागेतच पडून...

रामपूर :चिपळूण तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक व हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. देवखेरकी परिसरातील हापूस आंब्याच्या बागेत जळालेल्या अवस्थेत मानवी सांगाडा आढळून आल्याने संपूर्ण कोकणात खळबळ उडाली आहे.

प्राथमिक तपासानुसार, सुमारे १२ ते १३ वर्षे वयोगटातील मुलगा किंवा मुलगी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मृतदेह निळ्या रंगाच्या बॅगेत कोंबून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पेटवण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे हा मृतदेह सुमारे दीड महिन्यांपासून त्या बागेतच पडून होता. बागेत काम करणाऱ्या एका मजुराला हा मृतदेह आधीच दिसला होता; मात्र भीतीपोटी त्याने कोणालाही याबाबत माहिती दिली नाही. अखेर मानसिक ताण सहन न झाल्याने त्याने बाग मालकाला माहिती दिली आणि प्रकरण उघडकीस आले.

घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरून जळालेल्या बॅगेचे अवशेष तसेच काही लोखंडी रॉड जप्त करण्यात आले असून, फॉरेन्सिक तपासासाठी नमुने पाठवण्यात आले आहेत.

ही घटना पूर्वनियोजित खून असल्याचा संशय व्यक्त होत असून, संबंधित बालकाची ओळख पटवणे व आरोपींचा शोध घेणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button