
चिपळूण : मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात गोव्याकडे जाणारा मिथेनॉलने भरलेला टँकर महामार्गावर उलटून अपघात झाला. टँकरच्या खाली चालक सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या अपघाताची खबर मिळताच चिपळूण अग्निशाकम दल आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. टँकर उलटा झाल्याने परशुराम घाटातील एक लेन बंद करण्यात आली होती.
भरगाव वेगाने येणारा टँकर जेव्हा परशुराम घाट उतरत होता. तेव्हा अचानक चालकाचा टँकर वरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या बाजूला बांधलेल्या संरक्षक भिंतीला घासत जात टँकर महामार्गावर परशुराम घाटात उलटा झाला. यामध्ये चालकाच्या बाजूवर उलटल्याने चालक टँकर खाली सापडला. त्यामुळे चालकाचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची खबर मिळताच चिपळूण पोलिस यंत्रणा घटनेच्या ठिकाणी पोहचली. चिपळूण अग्नीशामक दलाचे कर्मचारीही पोहचले. टँकरमध्ये मिथेनॉल असल्याने अग्नीशामक दलाने पाण्याचा फवारा मारत मिथेनॉल साफ केले. सायंकाळी उशिरा पर्यंत टँकर रस्त्यावरच होता. मात्र, तो क्रेनच्या साह्याने हटवण्यात येणार असल्याचे समजले. या अपघातामुळे महामार्गवरील एक लेन बंद होती. या घटनेचा पुढील तपास चिपळूण पोलिस करत आहेत.



