ऑस्ट्रेलिया येथे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम युनिव्हर्सिटी सोहळ्यास उपस्थिती
युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलंडच्या विशेष स्नेहमेळाव्यात अनिरुद्ध निकम यांची विशेष उपस्थिती

चिपळूण :* ऑस्ट्रेलियातील नामांकित युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलंड (University of Queensland, Brisbane-Australia) यांच्या वतीने आयोजित विशेष स्नेहमेळाव्यात सह्याद्रि शिक्षण संस्था, सावर्डेचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध शेखर निकम यांनी विशेष अतिथी म्हणून सहभाग नोंदविला. नवी दिल्ली येथील ‘द इम्पेरियल हॉटेल’मध्ये मंगळवार, २६ मे २०२६ रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलंड ही कृषी व अन्न विज्ञान, वैद्यकीय जैवशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, पशुवैद्यकशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान या क्षेत्रांतील जागतिक स्तरावरील अग्रगण्य विद्यापीठ म्हणून ओळखली जाते. विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांसह भारतातील सहयोगी शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींसाठी आयोजित या विशेष स्नेहमेळाव्याला विद्यापीठाचे कुलपती प्रा. पीटर व्हर्गीज, कुलगुरू प्रा. डेबोराह टेरी, प्रो-व्हाइस चान्सलर प्रा. ब्रेट लव्हग्रोव्ह, इन्स्टिट्यूट डायरेक्टर प्रा. मॅथ्यू मोरेल आणि सायन्स फॅकल्टीच्या एक्झिक्युटिव्ह डीन प्रा. मेलिसा ब्राउन यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
जुलै २०२४ च्या मास्टर ऑफ अॅग्रिकल्चरल सायन्स (UQ Gatton Campus) बॅचचे माजी विद्यार्थी असलेले अनिरुद्ध निकम यांना या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
या वेळी अनिरुद्ध निकम यांनी विद्यापीठाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी शिक्षण, संशोधन विकास, आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्य तसेच भविष्यातील नाविन्यपूर्ण उपक्रमांबाबत चर्चा केली. तसेच सह्याद्रि शिक्षण संस्थेची कार्यपद्धती, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणारे उपक्रम आणि संशोधन क्षेत्रातील भविष्यातील संधी याविषयीही सकारात्मक संवाद झाला.
या सहभागामुळे सह्याद्रि शिक्षण संस्थेला आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक सहकार्याच्या नव्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



