महाराष्ट्रराजकीय

मंत्री नरहरी झिरवाळकर यांच्या अडचणीत वाढ

मंत्री झिरवाळांच्या व्हायरल व्हिडीओवर फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, "जर व्हिडीओ खरा असेल तर..."

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा मंत्री नरहरी झिरवाळ यांचा तृतीयपंथीयासोबतचा एक कथित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून राज्यातील राजकारण तापलं आहे.
या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया देताना स्पष्ट केलं की, “जर हा व्हिडीओ खरा असेल तर योग्य ती कारवाई केली जाईल.” त्यांनी सांगितलं की, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर झिरवाळ यांनी स्वतः फोन करून हा व्हिडीओ वेगवेगळे क्लिप एकत्र करून बनवला असल्याचा दावा केला आहे.
फडणवीस पुढे म्हणाले की, “मी त्यांना तात्काळ तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला आहे, जेणेकरून या प्रकरणाची शहानिशा होऊ शकेल. या संपूर्ण प्रकरणाची सत्यता तपासली जाईल आणि त्यानंतर त्यांच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल.”
दरम्यान, काही दिवसांपूर्वी झिरवाळ यांच्या कार्यालयातील क्लर्कच्या लाचखोरी प्रकरणामुळेही ते चर्चेत आले होते. त्या संदर्भात बोलताना फडणवीस म्हणाले की, “त्या प्रकरणात झिरवाळ यांचा थेट संबंध आढळला नाही. मात्र सध्याचा व्हिडीओ गंभीर स्वरूपाचा आहे, त्यामुळे त्याची सत्यता पडताळणं आवश्यक आहे.”
सध्या व्हायरल व्हिडीओमधील व्यक्ती झिरवाळ असल्याचा विरोधकांचा दावा आहे, मात्र याबाबत झिरवाळ यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. या प्रकरणामुळे राजकीय वातावरण अधिकच ढवळून निघालं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button