जि प प्रा शाळा खेर्डी देऊळवाडी शाळेच्या पाण्याचा प्रश्न मार्गी ग्रामस्थान मध्ये समाधान..
सामाजिक कार्यकर्ते खालिदभाई चौगुले यांच्या सहकार्याने खेर्डी देऊळवाडी शाळेची पाण्याची समस्या मार्गी
चिपळूण, प्रतिनिधी :
चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद खेर्डी देऊळवाडी मराठी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी आवश्यक असलेल्या बोरिंगचे काम सामाजिक कार्यकर्ते खालिदभाई चौगुले यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची दीर्घकाळची पाण्याची समस्या मार्गी लागली असून ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शाळेसाठी विविध भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेले माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अनिल फाळके यांनी सामाजिक कार्यकर्ते जमालुद्दीन बंदरकर व हनीफ चौगुले यांच्या माध्यमातून खेड तालुक्यातील बहिरवली गावचे सर्वधर्म समभाव जपत समाजसेवा करणारे खालिदभाई चौगुले यांच्याशी संपर्क साधला. शाळेसाठी बोरिंगच्या कामासाठी आर्थिक मदतीची विनंती करण्यात आली. या विनंतीला तत्काळ प्रतिसाद देत खालिदभाई चौगुले यांनी अवघ्या २४ तासांत एका दानशूर व्यक्तीमार्फत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले आणि बोरिंगचे काम पूर्णत्वास नेले.
या कार्याबद्दल ग्रामस्थांनी खालिदभाई चौगुले यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. एका ग्रामस्थाने आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की,
“मनामध्ये माणुसकीचा झरा, समाजसेवेचा माणूस आहे खरा; बहिरवली गावात जन्मला कोहिनूर हिरा.”
या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते जमालुद्दीन बंदरकर व हनीफ चौगुले यांचा ग्रामस्थांच्या वतीने श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सुखाईदेवी देवस्थानचे अध्यक्ष कैलास शेंबेकर, संतोष तांदळे, अशोक गुरव, आनंद गुरव, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष अनिल फाळके, उपाध्यक्ष महेश गुरव, कुंदन मोहिते, संतोष उतेकर, मंगेश पवार, रवींद्र फाळके, महेंद्र फाळके, शांताराम फाळके, शिक्षिका सीमा कदम-चव्हाण, बेबीताई गुरव, राज उतेकर, मिलिंद मोहिते, सुयोग फाळके, मोतीराम मोहिते, कृष्णा मोहिते, विलास कदम आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



