कोकणदेश-विदेशराजकीय

चिपळूणचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांची महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाच्या उपाध्यक्षपदी निवड

नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव

चिपळूण :* चिपळूण शहराचे नगराध्यक्ष उमेश संगीता धोंडीराम सकपाळ यांची महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघाच्या उपाध्यक्ष (कोकण विभाग) या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील ३९७ नगराध्यक्षांपैकी उमेश सकपाळ यांची निवड झाल्याने चिपळूणसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासाठी ही एक अभिमानाची बाब ठरली आहे.

महाराष्ट्र राज्य नगराध्यक्ष महासंघ हे संघटनात्मक पातळीवर कार्य करत असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समस्या शासन दरबारी प्रभावीपणे मांडण्याचे काम करते.उमेश सकपाळ यांना सामाजिक, संघटनात्मक आणि लोकाभिमुख कार्यातील सक्रिय सहभाग लक्षात घेऊन ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

नगराध्यक्ष म्हणून उमेश सकपाळ यांनी शहरातील विकासकामे, नागरी सुविधा, स्वच्छता, पायाभूत सुविधा तसेच लोकसहभागातून राबविलेल्या उपक्रमांमुळे नागरिकांचा विश्वास जिंकला आहे. विविध प्रशासकीय आणि विकासात्मक विषयांवर सातत्याने पाठपुरावा करणे ही त्यांची खास ओळख आहे.

उपाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे आता उमेश सकपाळ यांना कोकण विभागातील नगरपरिषद आणि नगर पंचायतींमधील समस्या, निधी, विकासकामे, नागरी सेवा आणि प्रशासनाशी संबंधित मुद्दे शासन स्तरावर अधिक प्रभावीपणे मांडता येणार आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना मोठा फायदा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

राज्यातील ३९७ नगराध्यक्षांमधून चिपळूणचे प्रतिनिधी उमेश सकपाळ यांची निवड झाल्याने शहरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटना, व्यापारी वर्ग, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे आणि आगामी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button