कोकणमहाराष्ट्रराजकीय

चिपळूण नगरपालिका मालमत्ता विभाग प्रमुख सागर शेडगे यांचे आरोप फेटाळले, कारवाईच्या दिला इशारा…

धमकी दिली नाही, नियमबाह्य कामाचा जाब विचारला: नगराध्यक्ष सकपाळ

•″चिपळूण : चिपळूण नगर परिषदेचे नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी मालमत्ता विभाग प्रमुख सागर शेडगे यांना धमकी दिल्याच्या आरोपांवर सविस्तर खुलासा करत हे आरोप फेटाळून लावले आहेत. संबंधित प्रकरणात आपण कोणालाही धमकी दिलेली नसून, नगर परिषदेच्या मालकीचा गाळा नियमबाह्य पद्धतीने देण्यात आल्याबाबत केवळ जाब विचारल्याचा दावा त्यांनी केला आहे.

नगराध्यक्ष सकपाळ यांनी सांगितले की, शहरातील एसटी स्टँड परिसरातील एक खोका पूर्वी म्हादे कुटुंबाच्या नावावर होता. संबंधित व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्यांचे आई-वडील तो व्यवसाय चालवत होते. त्यांनी जयश्री सावंत यांना पोटभाडेकरू म्हणून ठेवले होते. मात्र, त्यानंतर नगर पालिकेच्या प्रशासनाने कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता, जाहिरात न देता आणि अन्य पात्र अर्जदारांचा विचार न करता संबंधित गाळा थेट जयश्री सावंत यांच्या नावावर केल्याची माहिती श्री. सकपाळ यांनी दिली.

सकपाळ यांनी सांगितले की, जयश्री सावंत यांचे पती नगर पालिकेचे निवृत्त कर्मचारी असून त्यांना निवृत्तीवेतन मिळते. तसेच त्यांचा मुलगाही नगर पालिकेत कार्यरत आहे. अशा परिस्थितीत दिव्यांग आणि गरजू लाभार्थ्यांसाठी असलेला गाळा त्यांना देण्यात आल्याबाबत त्यांनी आक्षेप घेतला.

एका व्यक्तीला एकच लाभ या तत्त्वानुसार निर्णय व्हायला हवा होता. गाळा वाटपासाठी निविदा काढली का, जाहिरात दिली का, दिव्यांगांची यादी तपासली का, प्रतीक्षा यादीतील अर्जदारांचा विचार का झाला नाही, असे प्रश्न मी सागर शेडगे यांना विचारले. त्यावेळी त्यांनी हे सर्व मी माझ्या अधिकारात केले असल्याचे सांगितले, असे सकपाळ यांनी स्पष्ट केले.

यावर आपण, मी चाळीस हजार मतदारांमधून थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आलो आहे. माझे अधिकार काय आहेत हे मी तुम्हाला दाखवून देतो, असे म्हटल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र, हा संवाद प्रशासनातील जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी होता, त्यात कोणतीही धमकी अथवा अपमान करण्याचा हेतू नव्हता, असे त्यांनी सांगितले.

चिपळूण शहराचा विकास करून ते स्मार्ट सिटीच्या दिशेने नेण्याचा माझा प्रयत्न आहे. अधिकारी जर नियमबाह्य काम करत असतील आणि त्याचे समर्थन आपल्या अधिकारांच्या नावाखाली करत असतील, तर लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना जाब विचारणे माझे कर्तव्य आहे. अशा परिस्थितीत मी त्यांना माझ्या केबिनमधून बाहेर जाण्यास सांगितले. यात चुकीचे काहीही नाही, असे सकपाळ म्हणाले.

सागर शेडगे यांनी कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला. माझ्या जीवाला धोका असल्याचे सांगितले जात आहे. माझ्याकडून त्यांना कोणताही धोका नाही. उलट स्वतःची बदली व्हावी यासाठी हा प्रकार केला जात असावा, असा दावा त्यांनी केला.

सागर शेडगे हे निवृत्त सैनिक असून त्यांच्याबद्दल आपल्याला आदर असल्याचे सांगताना, मी त्यांच्याशी कोणतीही अयोग्य वागणूक केलेली नाही. चुकीची माहिती पसरवून जनतेची दिशाभूल करू नये. अन्यथा नगरविकास विभागाकडे त्यांच्याविरोधात कारवाईची मागणी करण्यात येईल, असा इशाराही नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी दिला.
#Varadmedia#

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button