लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना मोठी संधी; e-KYC दुरुस्तीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदत

चिपळूण, दि. १९ (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या पात्र महिलांसाठी e-KYC प्रक्रियेत झालेल्या त्रुटी दुरुस्त करण्याची महत्त्वाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही मुदत ३१ मार्च २०२६ पर्यंत मर्यादित असून, संबंधित लाभार्थींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या योजनेत अनेक महिलांनी e-KYC प्रक्रिया पूर्ण केली असली तरी काही प्रकरणांमध्ये कुटुंबातील सदस्यांच्या नोकरीसंदर्भातील माहिती भरताना चुकून चुकीचा पर्याय निवडला गेला आहे. विशेषतः कुटुंबातील सदस्य सरकारी किंवा निमसरकारी सेवेत कार्यरत आहे किंवा निवृत्त होऊन पेन्शन घेत आहे का, या बाबत माहिती देताना झालेल्या त्रुटींमुळे काही लाभार्थी अपात्र ठरण्याची शक्यता निर्माण झाली होती.
ही बाब लक्षात घेऊन शासनाने ६ फेब्रुवारी २०२६ रोजी शासननिर्णय जारी करत लाभार्थींना एकदाच सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार योजनेच्या अधिकृत पोर्टलमध्ये आवश्यक तांत्रिक बदल करण्यात आले असून, लाभार्थींना त्यांच्या e-KYC तपशीलात दुरुस्ती करता येणार आहे.
मात्र, ही संधी अंतिम असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ३१ मार्चनंतर कोणत्याही परिस्थितीत पुन्हा दुरुस्तीची संधी दिली जाणार नसल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, रत्नागिरी यांनी कळविले आहे.
दरम्यान, लाभार्थी महिलांनी आपल्या नोंदी अचूक तपासून आवश्यक त्या दुरुस्त्या वेळेत पूर्ण कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. योजनेंतर्गत लाभ सुरू ठेवण्यासाठी ही प्रक्रिया अत्यावश्यक असल्याने कोणतीही दुर्लक्ष होऊ नये, याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
भाजप चिपळूण शहराध्यक्ष तथा गटनेते शशिकांत श्रीकांत मोदी यांनीही लाभार्थींना वेळेत e-KYC दुरुस्ती पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.



