पूराच्या छायेतून सुरक्षिततेकडे… वाशिष्ठी तीराला संरक्षणाचा भक्कम कवच!
चिपळूण शहरातील वाशिष्ठी नदी तीरावरील वांगडे मोहल्ला पुरसंरक्षक भिंत बांधकामास तब्बल २४ कोटी ९९ लाख मंजूर

चिपळूण, दि. १९ (प्रतिनिधी) : चिपळूण शहरातील वाशिष्ठी नदीकाठावरील वांगडे मोहल्ला परिसरासाठी अखेर मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पूराच्या संकटाला सामोरे जाणाऱ्या या भागासाठी तब्बल २४ कोटी ९९ लाख रुपयांच्या पूर संरक्षक भिंत बांधकामास प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधान आणि दिलासा व्यक्त केला जात आहे.
वाशिष्ठी नदीच्या काठावर वसलेला बहादुरशेख पूल ते वांगडे मोहल्ला हा परिसर दाट लोकवस्तीचा असून, पूरपरिस्थितीत सर्वाधिक फटका बसणाऱ्या भागांपैकी एक आहे. विशेषतः जुलै २०२१ मधील भीषण पुरात या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरून घरांचे व मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. नदीच्या पात्राची वाढती रुंदी, पाण्याचा प्रचंड वेग आणि सतत होणारी भूक्षरणाची प्रक्रिया यामुळे नदीकाठावरील घरे धोक्याच्या छायेत होती.
या पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम यांनी मागील काही वर्षांपासून सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा केला. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत त्यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने प्रयत्न केले. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळून संबंधित कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
हा प्रकल्प कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार असून, क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रत्यक्ष पाहणीवर आधारित अंदाजपत्रक शासनाने मंजूर केले आहे. या प्रक्रियेत जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे तसेच तांत्रिक पथकाचे मोलाचे योगदान लाभले आहे.
दरम्यान, हा प्रकल्प केवळ पहिल्या टप्प्यातील असून पुढील टप्प्यात पेठमाप स्मशानभूमी ते होळी कट्टा तसेच फरशी पूल ते होळी कट्टा या भागांमध्येही पूर संरक्षक भिंतींच्या कामांना मंजुरी मिळविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. जून-जुलैपर्यंत या कामांनाही मान्यता मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
या निर्णयामुळे वर्षानुवर्षे पूराच्या भीतीत जीवन जगणाऱ्या वाशिष्ठी काठावरील नागरिकांसाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने उचललेले हे पाऊल चिपळूण शहराला पूरमुक्त करण्याच्या दिशेने महत्त्वाचे ठरणार असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
या कामास मंजुरी मिळाल्याबद्दल राज्यातील वरिष्ठ नेतृत्व तसेच जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांचे आमदार शेखर निकम यांनी आभार मानले असून, पूरमुक्त चिपळूणच्या दिशेने आणखी ठोस पावले उचलली जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.



