गुढीपाडव्याच्या निमित्ताने गिरगावात भव्य शोभायात्रा; महिलांची बाईक रॅली, कोळी नृत्याने रंगला उत्सव

मुंबई, दि. १९ : हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी गुढीपाडव्याचा सण गिरगावात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त काढण्यात आलेल्या मराठमोळ्या शोभायात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर आणि सांस्कृतिक सादरीकरणांमुळे संपूर्ण परिसर महाराष्ट्राच्या रंगात न्हाऊन निघाला होता.
गिरगावातील ही शोभायात्रा दरवर्षीप्रमाणे यंदाही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. नऊवारी साड्या परिधान केलेल्या महिला, फेटे बांधलेले पुरुष आणि विविध पारंपरिक पेहरावात सहभागी झालेले नागरिक यामुळे वातावरण अधिकच रंगतदार झाले होते. ढोल-ताशा पथकांच्या गजरात मिरवणूक मार्गक्रमण करत असताना नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला.
या शोभायात्रेतील प्रमुख आकर्षण ठरलेली महिलांची बाईक रॅली यंदाही दिमाखात पार पडली. मराठमोळ्या साड्या परिधान करून महिलांनी आत्मविश्वासाने बाईक चालवत सहभाग घेतला. काही महिलांनी सामाजिक संदेश देणारे वेष परिधान केले होते. सावित्रीबाई फुले यांच्या वेशात सहभागी झालेल्या स्वाती हांडे यांनी महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश दिला. तसेच भवानी देवीचा देखावा साकारत पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवण्यात आले.
याशिवाय, कोळी समाजाच्या पारंपरिक वेशभूषेत सादर करण्यात आलेले कोळी नृत्यही उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. मुंबईच्या सांस्कृतिक ओळखीचा भाग असलेल्या कोळी परंपरेचे दर्शन यावेळी घडले. कोळी बांधवांनी उत्साहात नृत्य सादर करत वातावरणात रंगत आणली.
संपूर्ण शोभायात्रेत लोकसंगीत आणि ढोल-ताशांच्या तालावर नागरिकांनी ठेका धरला. मराठी संस्कृती, परंपरा आणि एकात्मतेचे दर्शन घडवणारी ही मिरवणूक शांततेत आणि उत्साहात पार पडली. गिरगावात साजरा झालेला हा गुढीपाडवा पुन्हा एकदा मराठमोळ्या परंपरेचा उत्सव ठरला.



