राजापूर पत्रकार वारीशे खून प्रकरण; आंबेरकर पुन्हा न्यायालयीन कोठडीत

रत्नागिरी, दि. १९ : राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याची पुन्हा न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. वैद्यकीय कारणास्तव मिळालेल्या सहा आठवड्यांच्या अल्पकालीन जामीनाची मुदत संपल्यानंतर सत्र न्यायालयाने हा आदेश दिला.
राजापूर तालुक्यातील कशेळी येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांचा थार गाडीखाली चिरडून खून केल्याप्रकरणी आंबेरकरविरुद्ध भादवि कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. ७ फेब्रुवारी २०२३ रोजी पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यानंतर आंबेरकरने अनेक वेळा जामिनासाठी अर्ज केले, मात्र न्यायालयाने त्याचे नियमित जामीन अर्ज फेटाळले होते.
दरम्यान, वैद्यकीय कारणांचा दाखला देत आंबेरकरने पुन्हा जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत कठोर अटींसह सहा आठवड्यांचा अल्पकालीन जामीन मंजूर केला होता. आरोपीविरुद्धचे आरोप गंभीर असून खटला सुरू असल्याचेही न्यायालयाने नमूद केले होते.
जामीनाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर आंबेरकर न्यायालयासमोर हजर झाला असता, त्याची पुन्हा न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. सध्या या प्रकरणाची सुनावणी रत्नागिरी सत्र न्यायालयात सुरू असून पुढील कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



