कोकणमहाराष्ट्र

दादर–रत्नागिरी पॅसेंजर कायमस्वरूपी बंद; दादर–गोरखपूर एक्सप्रेस सुरू, कोकणवासियांमध्ये संताप

मुंबई, दि. २० : दादर–रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन कायमस्वरूपी बंद करून त्याच प्लॅटफॉर्मवरून दादर–गोरखपूर एक्सप्रेस सुरू करण्याच्या निर्णयामुळे कोकणवासियांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. रेल्वे प्रशासनाने उपनगरीय गाड्यांच्या संचालनाचे कारण देत ही पॅसेंजर सेवा दिवा येथे स्थलांतरित केल्याचे सांगितले असले, तरी प्रत्यक्षात कोकणातील प्रवाशांचा महत्त्वाचा पर्यायच बंद झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

कोरोना महामारीनंतर दादर–रत्नागिरी पॅसेंजर सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर ही सेवा पुन्हा सुरू होईल, अशी अपेक्षा कोकणवासियांना होती. मात्र, त्या जागी दादर–गोरखपूर एक्सप्रेस सुरू करण्यात आली आणि आता ही गाडी कायमस्वरूपी सुरू ठेवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी यासंदर्भात हिरवा कंदील दिल्याचे सांगितले जात आहे.

दादर–रत्नागिरी पॅसेंजर ही कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि किफायतशीर सेवा होती. मुंबई, उपनगर आणि पालघर जिल्ह्यातील हजारो प्रवासी गणेशोत्सव, शिमगोत्सव, दिवाळी, होळी अशा सणांच्या काळात या गाडीने प्रवास करत असत. विशेषतः पश्चिम रेल्वेच्या भागातील प्रवाशांसाठी ही गाडी कोकणात जाण्याचा प्रमुख आणि सोयीस्कर पर्याय होता.

गेल्या काही वर्षांत या गाडीच्या पुनरारंभासाठी कोकणवासियांकडून अनेक आंदोलने करण्यात आली. तसेच मध्य रेल्वेला वारंवार निवेदनेही देण्यात आली होती. मात्र, या सर्व मागण्यांकडे दुर्लक्ष करून पॅसेंजर सेवा बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आल्याने प्रवाशांमध्ये नाराजी वाढली आहे.

दुसरीकडे, बाहेरील राज्यांमध्ये जाणाऱ्या गाड्यांना मुंबईत स्थान देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही केला जात आहे. कोकणातील प्रवाशांच्या गरजांकडे दुर्लक्ष करून इतर मार्गांना प्राधान्य दिले जात असल्याची टीका स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, या निर्णयामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसणार असून भविष्यात या निर्णयाविरोधात पुन्हा आंदोलन छेडले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button