रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदी अस्मिता केंद्रे; उपाध्यक्षपदी विलास चाळके बिनविरोध

रत्नागिरी, दि. १९ : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध पार पडली. अध्यक्षपदी मंडणगड तालुक्यातील अनुभवी सदस्या अस्मिता केंद्रे यांची, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विलास चाळके यांची निवड करण्यात आली.
जिल्हा परिषदेत ‘बाळासाहेब ठाकरे’ सभागृहात सोमवारी ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भाऊसाहेब गलांडे यांनी कामकाज पाहिले. सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. दुपारी १ वाजेपर्यंत अध्यक्षपदासाठी अस्मिता केंद्रे आणि उपाध्यक्षपदासाठी विलास चाळके यांचेच अर्ज दाखल झाले.
यानंतर दुपारी ३ वाजता अर्जांची छाननी आणि माघार प्रक्रिया पार पडली. दोन्ही अर्ज वैध ठरल्याने आणि इतर कोणताही उमेदवार नसल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले. दुपारी ३.३० वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोघांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली.
नवीन अध्यक्ष अस्मिता केंद्रे या मंडणगड तालुक्यातील अनुभवी सदस्य म्हणून ओळखल्या जातात. तर उपाध्यक्षपदी निवड झालेले विलास चाळके यांना प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रातील मोठा अनुभव आहे. त्यांनी यापूर्वी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून काम पाहिले असून, जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ सभापती पदावरही त्यांनी प्रभावी कामगिरी केली आहे.
या निवडीनंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला. नव्या नेतृत्वामुळे जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विकासकामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.



