कोकणमहाराष्ट्र

रत्नागिरी पॅसेजंर दादरमधून हद्दपार केल्यास आम्ही आंदोलन छेडणार : शौकतभाई मुकादम

चिपळूण, दि. २० :  कोकण रेल्वे मार्गावरील दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी पुन्हा सुरु करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करून मध्य रेल्वेने दादर-गोरखपूर ही नवी गाडी कायमस्वरूपी सुरु केल्याने कोकणवासीयांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या निर्णयाविरोधात कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मुकादम म्हणाले की, “गेल्या ३२ वर्षांपासून कोकणवासीयांच्या सेवेत धावणारी दादर-रत्नागिरी पॅसेंजर गाडी कोरोना काळात बंद करण्यात आली. त्यानंतर ती पूर्णपणे पूर्ववत सुरु करण्यात आलेली नाही. सध्या ही गाडी केवळ दिव्यापर्यंतच चालवली जात आहे. त्यामुळे मुंबई-कोकण दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.”

कोकणातील प्रवाशांच्या सोयीसाठी ही गाडी पूर्ववत सुरु करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत असतानाही रेल्वे प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले, असा आरोप त्यांनी केला. “दादर-रत्नागिरी पॅसेंजरच्या जागी दादर-गोरखपूर ट्रेन सुरु करणे म्हणजे कोकणावर अन्याय असून हा निर्णय आम्ही कदापी सहन करणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

पूर्वी दादर-रत्नागिरी पॅसेंजरमध्ये संगमेश्वर, चिपळूण आणि खेड येथील प्रवाशांसाठी आरक्षित डबे ठेवण्यात आले होते. त्यामुळे स्थानिक प्रवाशांना मोठा दिलासा मिळत होता. मात्र, ही सुविधा बंद झाल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. “रेल्वे मंत्रालयाने आमच्या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून गोरखपूर ट्रेन सुरु केली आहे. हा कोकणवासीयांचा अपमान आहे,” असा संतापही मुकादम यांनी व्यक्त केला.

तसेच, दादर-रत्नागिरी पॅसेंजर आणि दादर-चिपळूण या दोन्ही गाड्या तात्काळ सुरु कराव्यात, अशी ठाम मागणी त्यांनी केली. “जर आमच्या मागण्या तात्काळ मान्य केल्या नाहीत, तर कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, या मुद्द्यावर कोकणातील विविध सामाजिक संघटना आणि प्रवासी संघटनाही आक्रमक होत असून, येत्या काळात रेल्वे प्रशासनाविरोधात आंदोलन उभारले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button